Baramati News l कोर्‍हाळे बुद्रुक येथे दीडशे वर्षे जुन्या वडाच्या झाडाला आग; ग्रामस्थांच्या तत्परतेने अनर्थ टळला

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
कोऱ्हाळे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील कोर्‍हाळे बुद्रुक येथे सिद्धेश्वर मंदिरासमोरील बाजारतळ परिसरात असलेल्या दीडशे वर्षे जुन्या वडाच्या विशाल झाडाला काल दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने आग विझवण्यासाठी ग्रामस्थांची एकच धावपळ उडाली.
या वडाच्या झाडाच्या पारंब्या व खोडाला लागलेल्या आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. गावचे पोलीस पाटील शरद खोमणे, भाग्यवान चव्हाण, भारत माळशिकरे, सचिन घाडगे, रतनकुमार दोशी, सचिन दोशी, दत्ता नलवडे, बंटी दोशी, नंदू जगदाळे आदींनी पुढाकार घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान, पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप धापटे यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्याशी संपर्क साधत अग्निशामक पाण्याचा टँकर तात्काळ उपलब्ध करून दिला. वेळेत टँकर मिळाल्यामुळे आग लवकरच आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.
सदर वडाचे झाड अंतर्गत रस्त्यालगत असून परिसरात अनेक घरे व व्यावसायिक दुकाने आहेत. त्यामुळे आग अधिक पसरल्यास मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत होती. तसेच या झाडावर अनेक वर्षांपासून वटवाघुळे व विविध पक्ष्यांचे वास्तव्य असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीनेही हे झाड अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
या झाडाखालीच कोर्‍हाळे बुद्रुक गावाचा पारंपरिक बाजार भरत असल्याने घटनेमुळे काही काळ ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आग वेळेत नियंत्रणात आल्याने मोठा धोका टळला.
दरम्यान, अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या तत्परतेमुळे वडाच्या झाडाचे मोठे नुकसान टळले. त्यांच्या या तातडीच्या मदतीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.
To Top