सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी (ता. बारामती) येथे दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त संत सावतामाळी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला.
जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. निरंजन फरांदे यांचे महात्मा फुले यांच्या जीवनावर व सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर व्याख्यान आयोजित करण्यात आले. आपल्या व्याख्यानात त्यांनी ऐतिहासिक दाखल्यांच्या आधारे समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा व अंधश्रद्धांवर मर्मभेदी भाष्य केले. तसेच महात्मा फुले यांच्या विचारांची आजच्या काळातील गरज अधोरेखित करत त्यांच्या जीवनप्रवासाचे सविस्तर विवेचन केले.
समाजाने शिक्षण, समता आणि विज्ञाननिष्ठ विचार स्वीकारल्याशिवाय खरी प्रगती साध्य होऊ शकत नाही, असे ठाम मत प्रा. फरांदे यांनी व्यक्त केले. त्यांच्या या प्रभावी व्याख्यानामुळे उपस्थितांना नवी दिशा व प्रेरणा मिळाली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून पुणे जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्राजक्ता दुर्गाडे उपस्थित होत्या. त्यांनीही आपल्या मार्गदर्शनात महात्मा फुले यांच्या विचारांचे आजच्या समाजातील महत्त्व अधोरेखित केले.
तसेच बारामती तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा ज्योती लडकत, वाघळवाडीचे सरपंच हेमंत गायकवाड, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शैलेश रासकर, ‘चांडाळ चौकडीच्या करामती’ फेम अभिनेते सुदामराव नेवसे, तसेच ‘रुबाब’ चित्रपट फेम अभिनेते प्रफुल्लकुमार कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सतीश सकुंडे यांनी केले.
