Beed News l एकाच घरातील तिन्ही भावंडे खाकी वर्दीत; पाटोद्याच्या नामदेव खेंगरेची पुणे पोलीस दलात निवड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पाटोदा : अक्षय इथापे 
जिद्द, चिकाटी आणि कुटुंबातील देशसेवेच्या प्रेरणेतून पाटोदा तालुक्यातील गांधनवाडी येथील तरुण नामदेव बाळू खेंगरे याने पोलीस भरतीत घवघवीत यश मिळवले आहे. पदवीधर (ग्रेज्युएशन) शिक्षण पूर्ण केलेल्या २४ वर्षीय नामदेवची पुणे शहर पोलीस दलात निवड झाली असून, त्याच्या या यशामुळे खेंगरे कुटुंबासह संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
नामदेवच्या या यशामागे त्याच्या कुटुंबाची मोठी प्रेरणा आहे. त्याचे मोठे भाऊ जयराम खेंगरे हे भारतीय सैन्य दलात 'पॅरा कमांडो' म्हणून देशसेवा बजावत आहेत, तर बहीण अश्विनी खेंगरे या मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. 
आपल्या भावंडांना वर्दीत पाहून नामदेवच्या मनातही खाकी वर्दी परिधान करून समाजाची सेवा करण्याची तीव्र इच्छा होती. आई केसरबाई यांचे पाठबळ आणि भावंडांच्या मार्गदर्शनामुळे नामदेवने अत्यंत कठीण परिस्थितीत आपला सराव सुरू ठेवला होता.

पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नामदेवने पूर्ण वेळ पोलीस भरतीसाठी झोकून दिले होते. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा अशा दोन्ही टप्प्यांवर त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली. एकाच घरातील तीन मुले आता देशसेवा आणि समाजसेवेसाठी सज्ज झाली आहेत. नामदेवच्या या निवडीबद्दल गांधनवाडी ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Tags
To Top