Pune Crime l दुसऱ्या लग्नासाठी आईनेच केली मुलाची हत्या

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
शिरूर : प्रतिनिधी 
 पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या दुसऱ्या लग्नात अडथळा ठरू नये, या विकृत मानसिकतेतून एका आईनेच आपल्या अवघ्या ११ महिन्यांच्या पोटच्या गोळ्याची निर्घृण हत्या केली. भांबर्डे गावात घडलेल्या या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणातील मृत बालकाचे वडील रवींद्र पवार यांनी आपला मुलगा अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तक्रार मिळताच तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान मुलाची आई पूजा पवार हिच्या वागण्यावर पोलिसांना संशय आला. सुरुवातीला तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपला गुन्हा कबूल केला.
आरोपी पूजा पवार हिला दुसरे लग्न करायचे होते. मात्र, ११ महिन्यांचा मुलगा सोबत असल्यास लग्नात अडचणी येतील, या विचाराने तिने पोटच्या मुलाचा काटा काढण्याचे ठरवले. तिने आपल्या लहान मुलाला घरातील सिमेंटच्या ओट्यावर जोरात आपटले, ज्यात त्या निष्पाप बालकाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिने मृतदेह एका कापडी पिशवीत भरला. ती पिशवी पाण्यात तरंगू नये म्हणून त्यात जड दगड भरून जवळच्या विहिरीत फेकून दिली.

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी विहिरीतून बालकाचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. आरोपी महिला पूजा पवार हिला अटक करण्यात आली असून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Tags
To Top