सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : प्रतिनिधी
चारित्र्यावर संशय घेऊन होणारा मानसिक-शारीरिक छळ आणि हुंड्यासाठी तगादा, या जाचाला कंटाळून एका १८ वर्षीय गरोदर नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वरकुटे बुद्रुक (ता. इंदापूर) येथे घडली आहे. सोमवारी (दि. २७) दुपारी ही घटना घडली. पोटात दुखत असतानाही सासरच्या लोकांनी दवाखान्यात नेण्यास नकार दिल्याने हतबल झालेल्या या तरुणीने मृत्यूला कवटाळले.
शिवानी विकास शिंदे (वय १८) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी शिवानीची आई दीपाली रामचंद्र जामदार (रा. बेलवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती विकास अजिनाथ शिंदे, दीर प्रकाश अजिनाथ शिंदे आणि सासू सुरेखा अजिनाथ शिंदे यांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवानीचा विवाह २०२५ मध्ये विकास शिंदे याच्याशी झाला होता. लग्नात माहेरच्यांनी ११ तोळे सोने आणि इतर साहित्यासह सुमारे १५ लाख रुपये खर्च केले होते. लग्नानंतर सुरुवातीचे दोन महिने सुखात गेल्यानंतर पती विकासने शिवानीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. मोबाईल तपासणे आणि मारहाण करणे असे प्रकार सुरू झाले. त्यातच सासू आणि दीर यांनीही तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.
काही दिवसांपूर्वी फिल्टर पाण्याचा प्लॅन्ट टाकण्यासाठी विकासने माहेरून २ लाख रुपये आणण्याची मागणी केली होती. त्यातील ५० हजार रुपये शिवानीच्या कुटुंबीयांनी दिलेही होते, मात्र उर्वरित पैशांसाठी तिचा छळ सुरूच होता.
शिवानी गरोदर असतानाही सासरच्या मंडळींनी तिला त्रास देणे थांबवले नाही. घटनेच्या दिवशी (२७ एप्रिल) दुपारी दीड वाजता शिवानीने आपल्या आईला फोन केला होता. "माझ्या पोटात खूप दुखतंय, पण हे लोक मला दवाखान्यात नेत नाहीत आणि उलट त्रास देत आहेत," अशी आर्त साद तिने घातली होती. दुर्दैवाने, तिची आई स्वतः रुग्णालयात दाखल असल्याने ती तातडीने पोहचू शकली नाही. या फोननंतर अवघ्या पाऊण तासात शिवानीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
