सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे पुन्हा एकदा भीषण वास्तव समोर आले आहे. देहूरोड परिसरातील सवाना चौकात बुधवारी रात्री भाजप कार्यकर्ते रमेश रेड्डी यांची अज्ञात हल्लेखोरांनी तब्बल १६ राऊंड फायरिंग करून निर्घृण हत्या केली. या थरारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ९ च्या सुमारास रमेश रेड्डी हे सवाना चौकात उभे असताना अचानक हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी एकामागून एक १६ गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी थेट रेड्डी यांच्या डोक्यात लागल्याने ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे, रमेश रेड्डी यांचे भाऊ विक्रम गुरुस्वामी रेड्डी यांचीही गेल्या वर्षी एका वाढदिवसाच्या पार्टीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणातील आरोपी सध्या जेलमध्ये आहेत. मात्र, त्या जुन्या प्रकरणातील 'तडजोड' किंवा आर्थिक वादातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
भरचौकात अशा प्रकारे गोळीबार करण्याची हिंमत गुंडांकडे येतेच कशी? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. १६ राऊंड गोळीबार, 'फिल्मी स्टाईल'ने पाठलाग करून हत्या. मृत रमेश रेड्डी यांच्या भावाचीही वर्षभरापूर्वी हत्या झाली होती. आरोपी फरार असून पोलीस तपासासाठी पथके रवाना.
वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पिंपरी-चिंचवड शहर आता 'गुन्हेगारांची राजधानी' बनतेय की काय, अशी भीती सामान्य नागरिकांमध्ये पसरली आहे. गुन्हे घडण्यापूर्वीच गुंडांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे.
