Purandar Airport l पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा मार्ग मोकळा; शेतकऱ्यांना प्रति एकरी १.५ कोटींचा मोबदला!

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे: प्रतिनिधी 
पुणे पुरंदर येथील नियोजित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला आता मोठी गती मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला भूसंपादनाचा दर अखेर निश्चित झाला असून, बाधित शेतकऱ्यांना प्रति एकरी १.५ कोटी रुपये इतका मोबदला दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, येत्या ४ मे पासून हा मोबदला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनासाठी एकूण ६,००० कोटी रुपयांच्या कर्जाचा भार विशेष हेतू प्राधिकरणावर (SPV) असणार आहे. यासाठी राज्य सरकारने 'हुडको'कडून कर्ज घेण्यास आधीच मान्यता दिली आहे. या प्राधिकरणात विविध संस्थांचा वाटा असेल सिडको (CIDCO): ५१% (सर्वाधिक वाटा) एमआयडीसी (MIDC), एमएडीसी (MADC) आणि पीएमआरडीए (PMRDA).
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आवश्यक ६,००० कोटींपैकी ५०० कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले असून, उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जाईल. ७ गावे आणि ३००० हेक्टर क्षेत्र विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांची जमीन निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ३,००० हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. जमिनीच्या दराव्यतिरिक्त घरे, झाडे, विहिरी आणि फळबागांचे मूल्यांकन स्वतंत्रपणे करून त्याचा अतिरिक्त मोबदला दिला जाईल. पारदर्शकता राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मोबदल्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर संमतीपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांना आधी मोबदला दिला जाईल.

राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीने दर निश्चित केल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रस्तावाला अंतिम मान्यता दिली आहे. जिल्हा प्रशासनाने पुढील सहा महिन्यांत भूसंपादनाचे संपूर्ण काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. बाधित शेतकऱ्यांनी यापूर्वीच आपली संमतीपत्रे प्रशासनाकडे जमा केली असल्याने, आता प्रत्यक्ष ताबा घेण्याची प्रक्रिया ४ मे पासून युद्धपातळीवर सुरू होणार आहे. पुणे जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुरंदरच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
To Top