सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : संतोष माने
इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीत शिकणारा शिवम विनोद कन्हेरकर याने भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती राज्यस्तरीय परीक्षा (IAS) मध्ये राज्यात सहावा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे परिसरात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी सहसा अशा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सहभागी होत नाहीत. मात्र शिवमने आपल्या जिद्द, चिकाटी आणि गुणवत्तेच्या जोरावर ही परीक्षा देत नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
शिवमशी संवाद साधला असता, त्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि शाळेतील शिक्षकांना दिले. पुढील वाटचालीबाबत विचारले असता, "मला आयएएस अधिकारी म्हणजेच कलेक्टर बनायचे आहे," असे त्याने आत्मविश्वासाने सांगितले. त्याच्या बोलण्यातून आणि वागणुकीतून त्याची अभ्यासू वृत्ती व मोठी स्वप्ने स्पष्ट दिसून आली. त्यामुळे ग्रामीण भागातील हा विद्यार्थी भविष्यात निश्चितच मोठे यश मिळवेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
शिवमच्या या यशाबद्दल गावचे सरपंच शिवाजीराव किसनराव कन्हेरकर तसेच ग्रामस्थ व मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
