सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरात IPO व शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यक्तीची तब्बल 1 कोटी 30 लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली असून, बारामती शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 44 लाख रुपये फ्रीज केले आहेत. या प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात फिर्यादी यांना “F24 Indian Stock Market Investors Discussion Group” नावाच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. आरोपींनी शेअर मार्केट, IPO व ट्रेडिंगमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला. त्यानंतर FARLEYLLC नावाचे बनावट अॅप डाउनलोड करून त्यावर खोटा नफा दाखवण्यात आला आणि वारंवार अधिक रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आले.
तपासात आरोपींनी विविध बँक खात्यांद्वारे पैसे स्वीकारून layering पद्धतीने ते इतर खात्यांमध्ये वळवले असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही रक्कम ATM व इतर माध्यमातून काढण्यात आली आहे. हा गुन्हा संघटित सायबर रॅकेटमार्फत करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामती शहर पोलिसांनी तांत्रिक तपास करत आतापर्यंत सुमारे 44 लाख रुपये फ्रीज केले असून, दोन आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असून, मनी ट्रेल, डिजिटल पुरावे आणि सोशल मीडिया नेटवर्कचा सखोल तपास सुरू आहे.
