Daund News l जमिनीच्या जुन्या वादातून वृद्धावर जीवघेणा हल्ला; खानोटा येथील बाप-लेकावर गुन्हा दाखल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
दौंड : प्रतिनिधी 
जमिनीच्या जुन्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसान एका भीषण रक्तपातात झाल्याची धक्कादायक घटना खानोटा (ता. दौंड) येथे घडली आहे. सात-आठ महिन्यांपूर्वीच्या रागातून आरोपींनी एका वृद्धाच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 
याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात बाप-लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विलास तुकाराम जाधव आणि कुणाल विलास जाधव (दोघे रा. खानोटा, ता. दौंड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी प्रशांत सदाशिव कोष्टी (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत कोष्टी आणि जाधव पिता-पुत्रांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जागेच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. २८ मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास आणि पुन्हा २९ मार्चला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आरोपींनी खानोटा गावातील जुन्या ग्रामपंचायत कट्ट्यासमोर प्रशांत कोष्टी यांना गाठून शिवीगाळ करत मारहाण केली.हे भांडण सोडवण्यासाठी प्रशांत यांचे वडील सदाशिव कोष्टी मध्यस्थी करत असताना, आरोपींनी त्यांच्यावर जाड लोखंडी रॉडने डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात सदाशिव कोष्टी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 

आरोपींनी जाणीवपूर्वक हा प्राणघातक हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.दौंड पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११०, ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक फौजदार संतोष शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे खानोटा परिसरात तणावाचे वातावरण असून संताप व्यक्त केला जात आहे.
Tags
To Top