सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खंडाळा : प्रतिनिधी
खंडाळा शहर व परिसरात बुधवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी झाडे पडणे, घरांवरील पत्रे उडणे आणि शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
दुपारच्या सुमारास आलेल्या या अचानक पावसामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची मोठी धांदल उडाली. बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यांसमोर पावसाचे पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले होते.
अचानक सुरू झालेल्या गारपिटमुळे नागरिकांना सुरक्षित स्थळ शोधण्यासाठी कसरत करावी लागली. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, खंडाळा ते हरळी रस्त्यावरील कॅनल परिसरात विद्युत तारा तुटून पडल्या. सुदैवाने, यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. महामार्गावरील एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या दुचाकीवर झाड कोसळल्याने वाहनाचे नुकसान झाले. तसेच, एका प्राथमिक शाळेचा पत्रा उडाला असून, शामराव बबन यादव यांच्या घरावरील सोलर पॅनेल वाऱ्यामुळे उडून गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेती शिवारातही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला कांदा आणि कडबा पावसात भिजल्याने नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके आणि साठवून ठेवलेला चारा खराब झाल्याने बळीराजा चिंतेत आहे.
पावसामुळे विश्रामगृहाजवळील विद्युत डीपी एका बाजूला झुकली होती, तर अनेक ठिकाणी तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पावसाची उघडीप मिळताच रात्री उशिरापर्यंत काम करून वीज पुरवठा सुरळीत केला.
दुसरीकडे, पारगाव-खंडाळा बसस्थानकाजवळील सेवा रस्त्यावर (Service Road) मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागली
