सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद, ता. खंडाळा येथील एका संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात वारकरी सेवक दत्तात्रय गावडे (पंत) यांना राज्यस्तरीय ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. वेदांत अॅग्रो टुरिझम येथे शुक्रवारी (ता. १०) दुपारी झालेल्या या कार्यक्रमात डॉ. नितीन सांवत व पंचायत समिती फलटणच्या सभापती कु. शिवांजली भोसले यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
या वेळी वारकरी सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बारवकर, उपाध्यक्ष मोहनकाका भांडवलकर, सचिव ह.भ.प. निखिल महाराज कदम, कार्याध्यक्ष दत्तात्रय भोसले गुरुजी, संपर्कप्रमुख गणेश शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गावडे पंत यांनी गेली चार वर्षे वारकरी सेवा संघ बारामती तालुक्याचे अध्यक्ष म्हणून कार्य करताना विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविले आहेत. सध्या ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. कोह्राळे बुद्रुक येथे हरिनाम सप्ताहाचे प्रमुख म्हणून गेल्या दहा वर्षांपासून ते कार्यरत असून व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्याचे आजीवन सदस्य आहेत. आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यात गेली वीस वर्षे दिंडी प्रमुख म्हणून पायी वारी करत त्यांनी वारकरी परंपरेचे जतन केले आहे. गरजू नागरिक व विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, तसेच नियमित नेत्ररोग व आरोग्य शिबिरे आयोजित करून त्यांनी समाजोपयोगी कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याच्या २ तारखेला मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते.
संत सोपानकाका पालखी सोहळा मार्गावर वृक्षारोपण व आरोग्य सेवा उपक्रम राबवून वारकऱ्यांच्या सेवेसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. शांत, संयमी स्वभाव व निष्कलंक चारित्र्यामुळे गावडे पंत यांची समाजात आदराची प्रतिमा निर्माण झाली आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना गावडे पंत यांनी, “हा सन्मान समाजसेवेची प्रेरणा वाढविणारा असून भविष्यातही अधिक जोमाने कार्य करत राहणार,” असे सांगितले. कार्यक्रमाचा समारोप ‘राम कृष्ण हरी’च्या गजरात झाला.
