सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान संचालित इंग्लिश मीडियम स्कूलमधील विज्ञान शाखेच्या अकरावीतील विद्यार्थिनी अनुष्का बापू कुतवळ हिने बुद्धिबळ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत अहमदाबाद येथे ऑल इंडिया चेस फेडरेशन यांच्या वतीने आयोजित १७ वर्षाखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिने तृतीय क्रमांक पटकावला. या यशामुळे अनुष्का कुतवळ हिची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशामुळे अनुष्काची निवड तीन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी झाली आहे. यामध्ये श्रीलंका येथे होणारी कॉमनवेल्थ बुद्धिबळ स्पर्धा, इटली येथे होणारी जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा तसेच आशियाई बुद्धिबळ स्पर्धा या तीनही स्पर्धांमध्ये ती भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, देशासाठी पदक मिळवण्याचा निर्धार तिने व्यक्त केला आहे. या स्पर्धेत देशभरातील अव्वल खेळाडूंमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. अनुष्काने संयम, अचूक गणिती विचारसरणी आणि उत्कृष्ट डावपेचांच्या जोरावर सातत्यपूर्ण कामगिरी करत हा मानाचा क्रमांक मिळवला. तिच्या खेळातील स्थिरता, कौशल्य आणि दबावाखाली शांत राहण्याची क्षमता विशेष लक्षवेधी ठरली. तिच्या या यशामुळे सुपे परागण्याचे नाव अधिकच उज्ज्वल होणार आहे. अनुष्काच्या यशामागे तिचे काका शशिकांत कुतवळ यांचे तसेच प्रशिक्षक अमितपाल सिंग, अनुप देशमुख आणि केतन खैरे आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
अनुष्काच्या या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ए. व्ही. प्रभुणे, खजिनदार युगेंद्र पवार, सचिव ॲड . नीलिमा गुजर, सदस्य डॉ. आर. एम शहा, किरण गुजर, मंदार सिकची, स्कूलचे प्राचार्य योगेश पाटील व सर्व स्टाफ यांनी अनुष्काच्या यशाबद्दल अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. लहान वयातच राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडणारी अनुष्का कुतवळ ही भविष्यात भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तिच्या या यशस्वी कामागिरीबद्दल सुपे परागण्यातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
