Baramati Crime l पोलिसांनी वडगाव निंबाळकर परिसरात सापळा लावला..! उसाच्या शेतातून पळून जाण्याच्या तयारीत दोघांच्या मुसक्या आवळल्या : ३५ गुन्ह्यांचा सराईत आरोपी जेरबंद; ३ खून उघड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कामगिरी करत ३५ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला साथीदारासह अटक करून पुणे ग्रामीण हद्दीतील दोन आणि ठाणे शहरातील एक अशा एकूण तीन खुनांचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलिसांचे कौतुक होत आहे. 
खेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या धनंजय घेवडे खून प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने तपासाची सूत्रे हलवली. दुर्गम भागात घडलेल्या या घटनेत सीसीटीव्ही नसतानाही पोलिसांनी जवळपास ११० कॅमेऱ्यांचा मागोवा घेत संशयितांचा शोध घेतला.
तपासादरम्यान ललित खोल्लम आणि नंदलाल होले हे संशयित म्हणून निष्पन्न झाले. पोलिसांनी वडगाव निंबाळकर परिसरात सापळा रचत उसाच्या शेतातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी धनंजय घेवडे याचा लोखंडी रॉड व दगडाने मारून खून केल्याची कबुली दिली. तसेच निलेश सणस याने या गुन्ह्यासाठी आर्थिक मदत केल्याचे उघड झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे.
तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली असून आरोपी ललित खोल्लम याने ठाणे येथे श्रीकांत वाडेकर याचे अपहरण करून खून केला आणि त्याचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट केला. तसेच त्याची आई रूपाली वाडेकर हिचाही खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार, जाळलेल्या कपड्यांची राख तसेच विहिरीत टाकलेला मोबाईल जप्त केला आहे. आरोपींकडून दोन गावठी पिस्तुले व चार काडतुसेही हस्तगत करण्यात आली आहेत. ललित खोल्लम याच्यावर यापूर्वी खून, दरोडा, चोरी, घरफोडी असे एकूण ३५ गुन्हे दाखल असून तो मोक्का अंतर्गत कारवाईनंतर जामिनावर बाहेर आला होता. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलिसांनी संयुक्तरित्या पार पाडली असून पुढील तपास सुरू आहे.
To Top