सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नाशिक : प्रतिनिधी
स्नेहसंमेलनाचा आनंद साजरा करून घराकडे परतणाऱ्या एका सुखी कुटुंबावर काळाने भीषण झडप घातली आहे. दिंडोरी येथील शिवाजीनगर भागात शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात, कार थेट विहिरीत कोसळून दरगोडे कुटुंबातील ९ सदस्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये ५ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरे येथील दरगोडे कुटुंब दिंडोरीतील एका मंगल कार्यालयात आयोजित खाजगी क्लासच्या स्नेहसंमेलनासाठी आले होते. कार्यक्रम आनंदाने पार पडल्यानंतर रात्री १० च्या सुमारास हे कुटुंब आपल्या इर्टिका कारने घराकडे निघाले. मात्र, मंगल कार्यालयापासून काही अंतरावरच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार रस्त्याशेजारील पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्याने आणि रात्रीचा अंधार असल्याने बचावकार्यात सुरुवातीला मोठे अडथळे आले. अखेर क्रेन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने अथक प्रयत्नांनंतर कार आणि मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
या हृदयद्रावक घटनेत सुनील दत्तात्रेय दरगोडे (३५), रेशमा सुनील दरगोडे (३३) यांच्यासह राखी, आशा, माधुरी आणि श्रावणी दरगोडे यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अवघ्या ७ ते १६ वर्षे वयोगटातील सृष्टी (१६), श्रेयश (११) आणि समृद्धी (७) या निष्पाप मुलांचाही यात समावेश आहे. एकाच कुटुंबातील नऊ जणांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने इंदोरे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
