सोमेश्वर रिपोर्टर टीम----
नातेपुते : विजय पवार
हे कुटुंब रामनवमीनिमित्त फोंडशिरस ता. माळशिरस या गावी यात्रेसाठी आले होते परंतु त्यांचा छोटा मुलगा त्यांचे मामा सुरेश महादेव बोराटे मामाकडे राहिला होता त्याला परत मुंबईला घेऊन जाण्यासाठी हे कुटुंब मुंबईहून गावाकडे फोंडशिरस येथे येत असताना कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला आहे. नातेपुते जवळील शेरे पुलाजवळ इर्टिगा कार निरा उजव्या कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात सासू, सासरे आणि पत्नी अशा तिघांचा मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला आहे. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी पहाटे ४:३० च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील मोहन टेळेकर (वय ४५, रा. मुंबई) हे आपल्या कुटुंबासह मुंबईहून माळशिरस तालुक्यातील फोंडशिरसकडे निघाले होते. त्यांचा मुलगा सध्या फोंडशिरस येथे मामाकडे असल्याने, त्याला घेण्यासाठी हे सर्वजण गावी येत होते.
पहाटे साडेचारच्या सुमारास नातेपुतेजवळील शेरे पुलाजवळ आले असता, चालकाचा गाडीवरील (एम एच ४३ सी सी ०१५८) ताबा सुटला आणि भरधाव कार थेट निरा उजव्या कालव्यात कोसळली.
हनुमंत लक्ष्मण जठार (वय ५५) - सासरे
मंजू हनुमंत जठार (वय ४९) - सासू( मोगराळे ता. माण जि सातारा,सध्या मुंबई येथे)
प्रीती सुनील टेळेकर (वय ३0) - पत्नी( फोंडशिरस ता. माळशिरस ) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने मदतकार्य सुरू केले. यामध्ये हनुमंत लक्ष्मण जठार आणि मंजू जठार यांचे मृतदेह हाती लागले आहेत. मात्र, सुनील टेळेकर यांची पत्नी प्रीती टेळेकर या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून त्यांचा शोध सुरू आहे.
या अपघातात सुनील मोहन टेळेकर (वय 36 फोंडशिरस ता. माळशिरस, सध्या मुंबई येथे)हे सुदैवाने बचावले असून ते जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुलाला मुंबईला घेऊन जाण्यासाठी गावी येत असताना वाटेतच कुटुंबावर ओढवलेल्या या संकटामुळे फोंडशिरस आणि नातेपुते परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
