Satara Breaking l कराड तालुक्यात निसर्गाचा कोप: अंगावर वीज पडून भोळेवाडीच्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
कराड : प्रतिनिधी 
तांबवे विभागात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने वादळी हजेरी लावली असतानाच, आज शुक्रवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. कराड तालुक्यातील भोळेवाडी येथील शिवारामध्ये अंगावर वीज पडल्याने सतीश नाथा सूर्यवंशी (वय ५०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. 
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांपासून कराड तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी दुपारी ३ ते ३:३० च्या सुमारास सतीश सूर्यवंशी हे आपल्या पत्नी आणि वहिनीसह 'माळ' नावाच्या शिवारात भाजीपाला तोडण्यासाठी गेले होते. 
यावेळी अचानक आलेल्या वादळी पावसादरम्यान विजांचा कडकडाट सुरू झाला आणि थेट सतीश यांच्या अंगावर वीज कोसळली. वीज पडल्याचा आवाज इतका प्रचंड होता की, सोबत असलेल्या त्यांच्या पत्नी आणि वहिनीचीही काही काळ शुद्ध हरपली होती.काही वेळाने दोघी शुद्धीवर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र सतीश सूर्यवंशी यांचा तोपर्यंत मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार कल्पना ढवळे, मंडल अधिकारी प्रशांत कोळी आणि महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील येरवळे येथेही नारळाच्या झाडावर वीज पडण्याची घटना घडली होती. सततच्या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
To Top