Indapur News l इंदापूरचा डंका..! अंकिता पाटील यांची पुणे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापतीपदी निवड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
इंदापूर : संतोष माने
पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी इंदापूरच्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे संपूर्ण इंदापूर तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे.
 नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत अंकिता पाटील यांनी संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांकाने निवडून येण्याचा बहुमान मिळवला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष) यांनी एकत्रित येत 'महायुती'च्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. 
या युतीचा प्रभाव असा होता की, इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व ८ जागा आणि पंचायत समितीच्या सर्व १६ जागांवर युतीचे उमेदवार विजयी झाले. विरोधकांना येथे खातेही उघडता आले नाही. अंकिता पाटील सभापतीपदी निवड झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना अंकिता पाटील म्हणाल्या, पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवून ही मोठी जबाबदारी दिली आहे, ती मी पूर्णपणे लोकाभिमुख होऊन पार पाडेल. महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध योजना थेट तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्यावर माझा भर असेल. विशेषतः महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी रोजगाराच्या व व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यास मी प्राधान्य देईन.

इंदापूरला तिसऱ्यांदा सभापतीपदाचा मान
 इंदापूर तालुक्याला जिल्हा परिषदेच्या राजकारणात मोठा इतिहास आहे. यापूर्वी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. तसेच दशरथ माने यांनी समितीचे सभापती म्हणून काम पाहिले असून, त्यांचे पुत्र प्रवीण माने यांनी देखील बांधकाम समितीचे सभापतीपद भूषवले आहे. आता अंकिता पाटील यांच्या निवडीमुळे इंदापूर तालुक्याला तिसऱ्यांदा जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाची संधी मिळाली आहे.

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या असलेल्या अंकिता पाटील यांच्या निवडीने जिल्ह्यात त्यांच्या राजकीय वर्चस्वाची पुन्हा एकदा मोहोर उमटली आहे. या निवडीबद्दल तालुक्यातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
To Top