सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनने उल्लेखनीय कामगिरी करत नागरिकांचे हरवलेले तब्बल ४ लाख ५ हजार रुपये किमतीचे १३ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत दिले. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मोबाईल हरवल्याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस हवालदार अनिल खेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून हरवलेले मोबाईल हस्तगत केले.
या मोहिमेत विविध कंपन्यांचे एकूण १३ मोबाईल जप्त करण्यात आले. त्यामध्ये आयफोनसारख्या महागड्या मोबाईलचाही समावेश होता. पोलिसांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून हे मोबाईल शोधून काढत संबंधित मूळ मालकांना परत केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस हवालदार अनिल खेडकर, पोपट नाळे, हदसनाथ देवकर व विलास ओमासे यांनी ही कामगिरी यशस्वी केली.
