सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण : प्रतिनिधी
एका मुलीसोबत मोबाईलवर चॅटिंग केल्याच्या कारणावरून १८ वर्षीय तरुणाची चौघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना ढवळपाटी (ता. फलटण) येथे घडली आहे. सोमनाथ संदीप जाधव (रा. मिऱ्याचीवाडी दालवडी, ता. फलटण) असे मृत युवकाचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
गुरुवारी (ता. ९) रात्री सोमनाथ घराबाहेर झोपला असताना मुलीशी व्हॉट्सॲपवर चॅटिंग करत होता. तिला भेटायला गेला असता मुलीच्या वडिलांनी त्याला पाहिले आणि त्याला पकडून मारहाण केली. त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास सोमनाथच्याच फोनवरून त्याच्या वडिलांना फोन करून ढवळपाटी येथे बोलावून घेण्यात आले. सोमनाथचे वडील तिथे पोहोचले असता, आरोपींनी तुमचा मुलगा आमच्या बहिणीशी चॅटिंग करतो, आता आम्ही त्याला जिवंत ठेवणार नाही, असे धमकावत त्यांच्यासमोरच सोमनाथला अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली. जीवाच्या आकांताने सोमनाथ तिथून पळू लागला, मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग केला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात त्याला गाठून पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याला डांबरी रस्त्यावर आपटण्यात आले. एका स्थानिक नागरिकाने मदत करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी कार आणि दुचाकीवरून पसार झाले. या भीषण मारहाणीत गंभीर जखमी झालेला सोमनाथ बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मृत सोमनाथचे वडील संदीप उमाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण ग्रामीण पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचा (कलम ३०२) गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपीं आदित्य विजय शिंदे (अटक), ओम लोखंडे, चिक्या लोखंडे, पिंटू लोखंडे (सर्व रा. ढवळ, ता. फलटण)
या प्रकरणाचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप करत आहेत.
