Pune Dams l खडकवासला धरण क्षेत्रात पावसाची फटकेबाजी; अडीच तासांत १०५ मि.मी. पावसाची नोंद

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे : प्रतिनिधी 
पुणे शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने धरण क्षेत्रालाही झोडपून काढले आहे. गुरुवारी (दि. २) खडकवासला धरण क्षेत्रात विजेच्या कडकडाटासह झालेल्या तुफान पावसामुळे अवघ्या अडीच तासांत १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
शहरात गेल्या दोन दिवसांपासून सकाळी कडक ऊन आणि दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस असे वातावरण पाहायला मिळत आहे. खडकवासला क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असला, तरी लगतच्या पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण क्षेत्रात मात्र पावसाने केवळ हजेरी लावली. 
सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये एकूण १३.८९ टीएमसी ४७.६५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा १ टीएमसी साठा अधिक आहे. अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हवेली ८.५ मि.मी. आणि पुरंदर-सासवड ३.५ मि.मी. भागात पावसाचा जोर अधिक होता. या नुकसानीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या आहेत.

४ एप्रिलपर्यंत दक्षतेचा इशारा
हवामान विभागाने ४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि पशुपालकांनी आपल्या मालाची व जनावरांची योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Tags
To Top