सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पोलिस दलात भरती झाल्याचे खोटे सांगून सोसायटीत पेढे वाटणे आणि चौकात अभिनंदनाचे फ्लेक्स लावणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. प्रत्यक्षात पोलिस भरती झालेली नसतानाही असा बनाव केल्याप्रकरणी नऱ्हे पोलिसांनी ऋषिकेश राजू जाधव (वय २६, रा. तिडके डेअरी, नऱ्हे रोड) या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
ऋषिकेश जाधव हा तरुण भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. त्याला पोलिस दलात भरती होण्याची ओढ होती, मात्र उंची कमी असल्याने त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. दुसरीकडे, घरच्यांकडून लग्नासाठी तगादा लावला जात होता. या दबावातून आणि पोलिस होण्याची इच्छा पूर्ण न झाल्याने त्याने घरच्यांना आणि परिसरात आपण पोलिस झाल्याचे खोटे सांगितले. सोसायटीत आपण पोलिस झाल्याचे सांगून सर्वांना पेढे वाटले. घराबाहेर आणि चौकात एक मोठा फ्लेक्स लावला. या फ्लेक्सवर महाराष्ट्र पोलिस दलाचे चिन्ह, पोलिसांच्या वर्दीतील स्वतःचा फोटो आणि 'पुणे शहर पोलिसपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन' असा मजकूर लिहिला होता. त्याने पोलिस वर्दीतील फोटो आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवून आपण सरकारी नोकर असल्याचे भासवले.
आपल्या हद्दीत नवीन कोण पोलिस झाला आहे, हे पाहण्यासाठी आणि त्या तरुणाचे अभिनंदन करण्यासाठी पोलिस तेथे पोहोचले. मात्र, जेव्हा पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आणि कागदपत्रांची मागणी केली, तेव्हा ऋषिकेशची भंबेरी उडाली. सखोल चौकशीअंती त्याने कोणताही अधिकृत दर्जा नसताना हा सर्व बनाव केल्याचे समोर आले. सार्वजनिक सेवक नसतानाही तसे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी नऱ्हे पोलिसांनी ऋषिकेश जाधव विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस फौजदार शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
