Baramati News l निंबुतच्या लकडे कुटुंबाची प्रेरणेतून यशाची किमया : एकाच घरात तीन 'सहाय्यक नगररचनाकार’

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
‘एकाच घरात एकाच पदावरचे तीन राजपत्रित अधिकारी’ ही दुर्मिळ कामगिरी निंबुत (ता. बारामती) येथील लकडे कुटुंबाने साध्य केली आहे. ‘एमपीएससी’ २०२२ परीक्षेतून अमरजीत लकडे आणि शिवानी लकडे हे पती-पत्नी ‘सहायक नगररचनाकार’ पदी निवडले गेले होते. आता ओंकार लकडे यानेही त्याच पदावर झेप घेत कुटुंबाचा लौकिक वाढविला आहे.
              विशेष म्हणजे, पदवी पूर्ण केल्यानंतर अवघ्या सात-आठ महिन्यांत पहिल्याच प्रयत्नात ओंकारने हे यश मिळविले असून ‘एनटी-सी’ प्रवर्गातून तो राज्यात दुसरा आला आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सहायक नगररचनाकार (श्रेणी-१) पदासाठी जून २०२५ मध्ये मुख्य परीक्षा, तर १० एप्रिल रोजी मुलाखती घेण्यात आल्या. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात ओंकार मीना महादेव लकडे हा भटक्या प्रवर्गातून राज्यात दुसरा, तर एकूण गुणवत्ता यादीत नव्वदावा ठरला आहे. काकडे महाविद्यालयाचे सचिव सतीश लकडे आणि स्व. महादेव लकडे हे सख्खे बंधू. सतीश लकडे यांचा मुलगा अमरजीत आणि सून शिवानी यांनी २०२२ मध्ये याच पदावर यश मिळविले होते. आता त्यांचा पुतण्या ओंकारही त्या पदावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे कुटुंबातील भाचा प्रतिक कराडे हाही याच पदावर कार्यरत आहे.

ओंकारने पुण्यातील ‘सीओईपी’ अभियांत्रिकी महाविद्यालयातून ‘टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग’ शाखेत पदवी घेतली. द्वितीय वर्षात असतानाच अमरजीत राजपत्रित अधिकारी बनल्याने प्रेरित होऊन त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पदवी पूर्ण होताच आत्मविश्वासाने परीक्षा व मुलाखत देत त्याने यश मिळविले. कोणतेही कोचिंग क्लास न लावता आणि काही काळ सोशल मीडियापासून दूर राहून त्याने पहिल्याच प्रयत्नात अधिकारीपद मिळविले. भाऊ प्रतिक, अमरजीत तसेच निषाद जोशी आणि प्रयास गुजर यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.
To Top