Pune News l सोशल मीडियावर तलवारीचे स्टेटस ठेवून दहशत माजवणारा तरुण जेरबंद; गुन्हे शाखेची कारवाई

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे : प्रतिनिधी 
सोशल मीडियाचा गैरवापर करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पुणे शहर पोलिसांनी आता कंबर कसली आहे. इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, शनिवारी (ता. २५) गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने रामटेकडी परिसरात एका तरुणाला अटक केली. अक्षय विकास कांबळे (वय २७, रा. शांतीनगर, रामटेकडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
          गुन्हे शाखा युनिट-२ चे कर्मचारी विशाल दळवी, ओंकार कुंभार आणि ऋषीकेश व्यवहारे हे वानवडी व रामटेकडी परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस हवालदार विशाल दळवी आणि ऋषीकेश व्यवहारे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक तरुण हातात तलवार घेऊन रामटेकडी येथील प्रथमा बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये थांबला आहे. धक्कादायक म्हणजे, या तरुणाने हातात तलवार घेतलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर 'स्टेटस' म्हणून ठेवून परिसरात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मिळालेल्या माहितीची खात्री पटताच पोलिसांनी प्रथमा बिल्डिंगच्या पार्किंगमधील पत्राशेडमध्ये छापा टाकला. पोलिसांनी अक्षय कांबळे याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या झडतीमध्ये ३ हजार ५०० रुपये किमतीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.

आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७७/२०२६ नुसार कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम (Arms Act) कलम ४(२५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) आणि १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, साधना ताम्हाणे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.
Tags
To Top