Baramati News l बारामतीत ५२ वर्षीय नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बळजबरीने गर्भपात केल्याने खळबळ

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बारामती : प्रतिनिधी 
बारामती तालुक्यात माणुसकीला लज्जित करणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्याच नात्यातील एका १२-१३ वर्षांच्या असहाय्य मुलीवर ५२ वर्षीय नराधमाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर, आरोपीने तिचे शोषण लपवण्यासाठी खाजगी रुग्णालयात तिचा बळजबरीने गर्भपातही घडवून आणला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
          मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित मुलीच्या जवळच्या नात्यातील आहे. नात्यातील विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने या चिमुकलीला आपल्या वासनेची शिकार बनवले. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही, तर कोवळ्या वयातील या मुलीला धमकावून त्याने वारंवार तिचे शारीरिक शोषण केले. काही दिवसांनंतर पीडित मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. पाप उघड होईल या भीतीने आरोपीने तिला एका खाजगी रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात केला. मात्र, या प्रक्रियेनंतर हा संपूर्ण अमानुष प्रकार उघड झाला. हा प्रकार परिसरात समजताच नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. संतप्त जमावाने आरोपीला गाठून त्याला चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. बारामती पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ज्या नात्यांमध्ये लहान मुले सुरक्षित असणे अपेक्षित असते, तिथेच 'रक्षक भक्षक' बनल्याने समाजात भीतीचे वातावरण आहे. घराचा उंबराही सुरक्षित न उरल्याने आता आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. 

कायदे आणि पोलीस आपले काम करतीलच, मात्र अशा विकृत मानसिकतेला ठेचण्यासाठी समाजात वचक निर्माण होणे गरजेचे आहे. लहान मुलांचे सुरक्षिततेबाबतचे समुपदेशन आणि अशा गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन होणे हीच या पीडितेसाठी खरी न्याय ठरेल. समाजाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभा करणाऱ्या या घटनेने "आपली मुले सुरक्षित आहेत का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
To Top