Daund Crime l नगरकडून साताराकडे जाणारा १३ लाखांचा ५२ किलो गांजा जप्त : दौंड पोलिसांची मोठी कारवाई

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
दौंड : प्रतिनिधी 
अहिल्यानगरकडून साताऱ्याच्या दिशेने होणारी अंमली पदार्थांची तस्करी दौंड पोलिसांनी उधळून लावली आहे. रेल्वे उड्डाणपुलाजवळ सापळा रचून पोलिसांनी एका कारमधून तब्बल ५२ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत गांजा आणि कारसह एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, मध्य प्रदेशातील एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
            अहिल्यानगरकडून साताऱ्याकडे एका कारमधून गांजाची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रेल्वे उड्डाणपुलाजवळ नाकाबंदी करून सापळा रचला. संशयित कार येताच पोलिसांनी तिला थांबवण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहताच चालकाने पळून जाण्याच्या इराद्याने गाडीचा वेग वाढवला आणि पोलिसांचा घेराव तोडण्याचा प्रयत्न केला. पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपीच्या कारने रस्त्यावरील एका अन्य चारचाकी वाहनाला धडक दिली. मात्र, दौंड पोलिसांनी तत्परता दाखवत पाठलाग करून कारला अडवले आणि चालक मुकेश कणोजे (वय ३६, रा. मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले. गाडीची झडती घेतली असता त्यात गांजाचे मोठे गठे मिळून आले.

जप्त केलेला मुद्देमाल ५२ किलो सुमारे १३ लाख रुपये (कारसह) ही धडक कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, उपनिरीक्षक रूपेश कदम आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
To Top