सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या चार रिक्त विषय समित्यांच्या सभापतीपदाचा पेच अखेर सुटला असून, यामध्ये मावळ, वेल्हे, हवेली आणि इंदापूर या तालुक्यांनी बाजी मारली आहे. अनपेक्षितपणे बारामतीसह खेड, जुन्नर आणि शिरूर या तालुक्यांना या शर्यतीत डावलण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाठवलेल्या बंद पाकिटातून गुरुवारी सकाळी चार सदस्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
निवड झालेले उमेदवार आणि त्यांना मिळणारी संभाव्य पदे दीपाली हुलावळे - मावळ बांधकाम व आरोग्य / कृषी व पशुसंवर्धन, अमोल नलावडे - वेल्हे बांधकाम व आरोग्य / कृषी व पशुसंवर्धन, अंकिता पाटील - इंदापूर महिला व बालकल्याण, जितेंद्र बढेकर - हवेली समाजकल्याण
जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांच्या पत्राद्वारे ही नावे जाहीर करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील आणि गटनेते श्रीमंत ढोले उपस्थित होते.
नकार आणि संधी- भोरचे विक्रम खुटवड यांनी सभापतीपद स्वीकारण्यास नकार दिल्याने, त्यांच्या जागी ऐनवेळी वेल्हे तालुक्यातून अमोल नलावडे यांची वर्णी लागली.
आमदारांचा विरोध डावलला- काही तालुक्यांना संधी देऊ नये, अशी मागणी आमदारांकडून करण्यात आली होती; मात्र पक्षश्रेष्ठींनी ही मागणी फेटाळून लावत प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला.
बारामती 'आऊट', इंदापूर 'इन'- राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा बारामतीचा पत्ता कट होऊन इंदापूरला (अंकिता पाटील) मिळालेल्या संधीची आहे.
या निवडीमुळे जिल्हा परिषदेच्या राजकारणात मावळ, वेल्हे, हवेली आणि इंदापूर या तालुक्यांचे वजन वाढले आहे. चारही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून, आता केवळ औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे. या निवडीमुळे जिल्हा परिषदेतील सत्तेची गणिते बदलली असून, आगामी काळात या समित्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामांना कशी गती मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
