Wai Crime l केबल चोरी करणारा आरोपी शेतकऱ्यांच्या मदतीने जेरबंद; २.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील आसरे गाव परिसरात केबल चोरी करणाऱ्या एका संशयित इसमाला शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात वाई पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून तब्बल २ लाख १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. २८ मार्च २०२६ रोजी आसरे गावातील शेतकऱ्यांनी केबल चोरी करणाऱ्या एका संशयित इसमास पकडून ठेवल्याची माहिती वाई पोलिस ठाण्यास मिळाली. 
त्यानुसार पोलीस हवालदार  इथापे, पोलीस अंमलदार श्रावण राठोड व नितीन कदम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले.

तपासादरम्यान आरोपीचे नाव अक्षय विलास गायकवाड (रा. अंगापूर, ता. सातारा, जि. सातारा) असे असल्याचे समोर आले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने आसरे, आकुशी व कोंढवली परिसरात केबल चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ७६० मीटर लांबीची केबल, ४३ किलो तांब्याची तार असा एकूण २,१६,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली एमएच ११ डीके ३५७९ क्रमांकाची दुचाकीही ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणी वाई पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक तुशार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक प्रमुख सुधीर वाळुंज, पो.ह.वा. इथापे, पो.कॉ. नितीन कदम, हेमंत शिंदे, विशाल शिंदे, श्रावण राठोड, पोलीस पाटील संदेश वेताळ, गणेश जांभळे, सचिन सपास तसेच आसरे येथील शेतकऱ्यांच्या सहकार्याने पार पडली.
या कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे कौतुक केले असून पुढील तपास पो.ह.वा. इथापे करीत आहेत.
To Top