Purandar News l नीरेतील हारविक्रेत्याच्या मुलाची भरारी; रुपेश कांबळेची सहाय्यक नगररचनाकार पदावर झेप

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील नीरा येथील रूपेश सूर्यकांत कांबळे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करत सहाय्यक नगररचनाकार पदाला गवसणी घातली आहे. हार विक्री व्यवसाय करणाऱ्या आई-वडिलांना हातभार लावत रूपेशने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
रूपेशचे प्राथमिक शिक्षण नीरा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले, तर पाचवी ते आठवीचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात पूर्ण झाले. नववीसाठी त्याची पुण्यातील जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली. तेथेच त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले.
बारावीनंतर आर्किटेक्चरच्या ‘नाटा’ प्रवेश परीक्षेत त्याने महाराष्ट्रात प्रथम व देशात १९ वा क्रमांक मिळवला. त्यानंतर पुण्यातील पी.व्ही.पी. महाविद्यालयातून आर्किटेक्चर इंजिनिअरिंगची पदवी घेतली. शिक्षणासोबतच त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. सुट्टीच्या काळात आई-वडिलांच्या व्यवसायात मदत करत अभ्यासात सातत्य राखले.
रूपेशचे वडील सूर्यकांत कांबळे आणि आई सुवर्णा कांबळे हे पदवीधर असून, आर्थिक अडचणींमुळे त्यांनी नीरा बाजारपेठेत फुलांचे हार व बुके बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. त्या पार्श्वभूमीवर रूपेशने मिळवलेले यश विशेष उल्लेखनीय मानले जात आहे.
शुक्रवारी (दि. १७) निकाल जाहीर होताच रूपेशची निवड झाल्याचे समजताच नीरा ग्रामस्थांसह मित्रपरिवाराने फटाक्यांची आतषबाजी, गुलाल उधळत वाजतगाजत मिरवणूक काढून आनंद साजरा केला.
यावेळी माजी उपसरपंच राजेश काकडे, विराज काकडे, समर्थ पतसंस्थेचे चेअरमन राजेश चव्हाण, अँड. उत्तमराव आगवणे, योगेंद्र माने तसेच चर्मकार महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व स्तरातून रूपेशचे कौतुक होत आहे.
कोट :
“स्पर्धा परीक्षांमध्ये यश-अपयश येतच असते. अपयशाने खचून न जाता सातत्य आणि चिकाटी ठेवली तर यश निश्चित मिळते. माझ्या यशामध्ये आई-वडील व नातेवाईकांचा मोठा वाटा आहे. पुढील उद्दिष्ट राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होणे हे आहे.”
— रूपेश सूर्यकांत कांबळे

-
To Top