सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
हनी ट्रॅपच्या माध्यमातून सरकारी अधिकाऱ्याला जाळ्यात ओढून अॅट्रॉसिटी कायद्याची भीती दाखवत लाखोंची खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी असून त्यांचा परिचय बारामतीतील एका प्रशिक्षण केंद्रात गेस्ट लेक्चरर म्हणून काम करत असताना काही व्यक्तींशी झाला होता. त्यानंतर एका महिलेकडून वारंवार फोन व व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्यात येत होता. सुरुवातीला मार्गदर्शनाच्या नावाखाली संवाद सुरू करण्यात आला; मात्र पुढे हा संवाद जाणीवपूर्वक ओळख वाढवून जाळ्यात ओढण्याच्या उद्देशाने असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, फिर्यादी यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. तसेच खोटा बलात्कार व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत सुरुवातीला सुमारे ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. ही मागणी टप्प्याटप्प्याने कमी करत २५ लाख आणि नंतर १० लाख रुपयांपर्यंत आणण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान आरोपींकडून फिर्यादी यांना अनेक वेळा फोन करून धमक्या देण्यात आल्याचे उघड झाले असून, दबाव टाकत तातडीने एक लाख रुपये उकळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही रक्कम बारामती एमआयडीसी परिसरातील पेट्रोल पंपाजवळ मध्यस्थांमार्फत देण्यात आल्याचेही समोर आले आहे.
याशिवाय, फिर्यादी यांना प्रत्यक्ष भेटीस बोलावून वाहनात बसवून मोबाईल तपासणे, दमदाटी करणे व मानसिक दबाव आणत पुन्हा मोठ्या रकमेची मागणी करण्यात आल्याचे तपासात आढळले आहे. पैसे न दिल्यास खोटा गुन्हा दाखल करून नोकरी घालवण्याची व बदनामी करण्याची धमकी आरोपींकडून देण्यात आली होती.
या प्रकरणात पोलिसांनी डिजिटल पुरावे जप्त करून त्यांची तांत्रिक तपासणी सुरू केली आहे. आवाजाची वैज्ञानिक पडताळणी, सीसीटीव्ही फुटेज व कॉल डिटेल रेकॉर्डचा अभ्यास केला जात आहे. दरम्यान, अपरिचित व्यक्तींशी सोशल मीडिया अथवा व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क ठेवताना सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
