Satara News l सातारा जिल्हा परिषद सभापती निवड: प्रशासनाकडून १०० मीटर परिसरात जमावबंदी लागू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी 
सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडी शनिवारी दि. ०४ तारखेला पार पडणार आहेत. या निवडीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हा परिषद इमारतीच्या १०० मीटर परिसरात सकाळी ७ वाजेपासून सभा संपेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.
गेल्या २० मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी दोन गटांत झालेल्या राड्यामुळे आणि जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
 या घटनेचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटले होते. उद्या होणाऱ्या समाज कल्याण, महिला व बालकल्याण, कृषी व पशुसंवर्धन, तसेच शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती निवडीवेळी अशा प्रकारची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेशाची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, जिल्हा परिषद इमारतीपासूनचा १०० मीटरचा परिसर 'प्रतिबंधित क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आला आहे. या काळात केवळ नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य, अधिकृत शासकीय अधिकारी व कर्मचारी, पोलीस प्रशासन यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

निवड प्रक्रियेच्या काळात परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल. राजकीय कार्यकर्त्यांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
To Top