सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने वहिनीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना नागेवाडी ता. वाई येथे घडली असून आरोपी दिरास वाई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गीताबाई चंद्रकांत यादव रा. नागेवाडी असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यामुळे वाई तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. तिचा पती चंद्रकांत विठ्ठल यादव वय ५० वर्षे रा. नागेवाडी यांनी वाई पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, माझा मोठा भाऊ भिकू विठ्ठल यादव वय ५५ वर्षे रा, नागेवाडी याने माझी पत्नी गीताबाई चंद्रकांत यादव वय ४५ वर्षे रा. नागेवाडी ता. वाई हिचा खून केला आहे.
घटना स्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, वडिलोपार्जित शेतीजमिनीच्या विक्रीवरून कुटुंबात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. आरोपी भिकू यादव हा वारंवार जमीन विकून टाकण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र फिर्यादी व त्यांच्या पत्नीने जमीन विकण्यास साफ नकार दिल्याने आरोपी संतप्त झाला होता.दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आरोपी पुन्हा घरात आला. त्या वेळी फिर्यादी शेतीच्या कामासाठी बाहेर पडत असताना त्यांना पत्नीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी शेजाऱ्यांसह घरात धाव घेतली असता गीताबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. आरोपी भिकू यादव हा धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. उपस्थितांना पाहताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. घटनास्थळी गीताबाई यांच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्या असून त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी गावचे पोलीस पाटील दीपक बनसोडे यांना माहिती देण्यात आली असून वाई पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुनाच्या गुन्ह्यांतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आरोपी हा गुन्ह्गार प्रवृत्तीचा असून या घटनेमुळे वाई तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नातेवाईकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
