Baramati Crime News | अंधश्रद्धा, काळी जादूच्या नावाखाली महिलांची फसवणूक; बारामती पोलिसांची मोठी कारवाई

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
अंधश्रद्धा, खोटे धार्मिक व तांत्रिक उपाय, काळी विद्या दूर करण्याचे आमिष दाखवून महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध बारामती शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी मौलाना अब्दुल हलीम शेख व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका महिलेने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा रजि. नं. १९४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३१६, ३१८(४), ३५१(२), ७४, ७५, ३(५) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व काळी जादू प्रतिबंध व निर्मूलन अधिनियम २०१३ च्या कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेच्या माहितीनुसार आरोपी स्वतःला मौलाना, धार्मिक व तांत्रिक उपाय करणारा तसेच काळी विद्या दूर करणारा म्हणून लोकांमध्ये ओळख निर्माण करत होता. घरगुती, कौटुंबिक, आर्थिक व व्यावसायिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवत आरोपी नागरिकांचा विश्वास संपादन करून “दरबार” भरवत असल्याचे समोर आले आहे.
तपासात आरोपी व त्याच्या संबंधितांनी फिर्यादी महिलेकडून विविध वेळेस रोख रक्कम, चेक तसेच ऑनलाइन व्यवहाराद्वारे मोठ्या प्रमाणावर पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. यासंदर्भातील PhonePe, UPI व्यवहार, WhatsApp चॅट, मोबाईल कॉल तपशील तसेच इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
तसेच आरोपीने तथाकथित तांत्रिक उपायांच्या नावाखाली महिलेस रात्री-अपरात्री बोलावून तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. “काळी विद्या करेन”, “वाईट परिणाम होतील”, “तुझ्या कुटुंबाला त्रास होईल” अशा धमक्या देत महिलेमध्ये भीती निर्माण करण्यात आल्याचेही तपासात उघड झाले आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळताच आरोपी काश्मीर येथे पळून गेल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. पोलिसांकडून मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार व इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा तांत्रिक तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव करीत आहेत.

दरम्यान, आरोपीने इतर महिलांनाही अशाच प्रकारे अंधश्रद्धा, आर्थिक फसवणूक, धमकी किंवा गैरवर्तन केले आहे काय याचाही तपास बारामती शहर पोलीस करणार आहेत.
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत अशाच प्रकारे अंधश्रद्धा, काळी विद्या, तांत्रिक उपाय किंवा धार्मिक भीती दाखवून कोणाचीही फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष हजर राहून माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, अशी ग्वाहीही पोलिस प्रशासनाने दिली आहे. सध्या सोशल मीडिया, मोबाईल संपर्क व ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या भोंदूगिरी व अंधश्रद्धेच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी खोट्या आश्वासनांना बळी पडू नये, असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.

To Top