Indapur News l इंदापूर तालुक्यात हजारो एकरांवरील ऊस जळाला; पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकरी हवालदिल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
प्रतिनिधी : संतोष माने 
इंदापूर, खडकवासला पाटबंधारे विभागाच्या गलथान आणि नियोजनशून्य कारभाराचा फटका इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला असून, पाण्याअभावी हजारो एकरांवरील ऊसासह इतर पिके अक्षरशः जळून गेली आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी लाभधारक शेतकऱ्यांकडून होत आहे.
इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकरी मागील अनेक दिवसांपासून हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन करत आहेत. वेळेत आवर्तन न सोडल्याने उसाची पिके करपली असून जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून ऊस लागवड केली होती; मात्र पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पिके वाचवता आली नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
“वेळेत पाणी मिळाले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आमचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली. प्रशासनाच्या विरोधात परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सोसायट्या आणि बँकांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. वाढत्या आर्थिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी होत आहे.

कृषी विभाग आणि महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून प्रति एकर सरासरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
To Top