सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील लाटे गावचे सुपुत्र आणि नागालँड राज्याचे कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी विक्रम मुकुंदराव खलाटे यांची केंद्रसरकारच्या पोलिस महानिरीक्षक (IG ) या विशेष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
खलाटे हे २००८ च्या तुकडीचे नागालँड केडरचे आयपीएस (IPS) अधिकारी आहेत. सध्या ते नागालँड राज्यात पोलिसात गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आता पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट समितीने जाहीर केलेल्या अधिकाऱ्यांच्या पोलिस महानिरीक्षक पदाच्या पॅनेलमध्ये त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे ते केंद्रीय स्तरावर पोहोचले असून लवकरच केंद्रसरकारमध्ये मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
खलाटे हे कर्तव्यदक्ष आणि धाडसी अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांची आतापर्यंतची कारकीर्द अत्यन्त संवेदनशील प्रकरणातील सखोल गुन्हेगारी तपास आणि अंमली पदार्थ विरोधी मोहिमांमध्ये अतिशय उल्लेखनीय राहिलेली आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण बजरंगवाडी जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण कोऱ्हाळे येथे सिद्धेश्वर विद्यालयात झाले. माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयपीएस अधिकारी बनले.
नागालँड राज्यात निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडल्यानंतर त्यांना 'राज्यपाल सुवर्ण पदका'ने गौरविण्यात आले होते.
तसेच अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात त्यांच्या नेतृत्वाखाली नागालँड पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त करत आंतरराज्य तस्करांना जेरबंद केले आहे. ईशान्य भारतातील वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम राबवली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) मध्ये असताना त्यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली होती.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलीया' निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याच्या आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास मुख्य विक्रम खलाटे यांच्यावर सोपवण्यात आला होता.
विमान अपहरण प्रकरणाचा तपास अतिशय कौशल्याने केल्याबद्दल तसेच गुन्हे अन्वेषणातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना दोन वेळा केंद्र सरकारतर्फे अत्यंत प्रतिष्ठेचे 'केंद्रीय गृहमंत्री पदक' मिळाले होते. याशिवाय विशेष तपासाबद्दल 'एनआयए महासंचालक यांची 'सिल्वर डिस्क' त्यांना प्रदान करण्यात आली होती.
