सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
टिकाव-खोर हाती घेऊन मातीशी दोन हात करत, दुसऱ्याच्या शेतात जात पाईपलाईन खोदत तर जमिनीशी एकरूप होऊन टिकाव-खोर घेऊन कष्टाच्या घामाने कुटुंबाचा गाडा त्यांच्या आज्जी-आजोबांनी हाकला. पुढच्या पिढीनेही त्याच कष्टमय वाटेवर पाऊल टाकले; पण “आपल्या मुलांच्या वाट्याला हेच निबार कष्ट येऊ नयेत,” या जिव्हाळ्याच्या भावनेतून वडिलांनी शिक्षणाची ज्योत पेटवली आणि कुस्तीच्या मैदानातही मुलींना घडवले. कष्टाची ताकद आणि स्वप्नांची उंची यांचा सुंदर संगम घडवत तिसऱ्या पिढीने आज यशाचे शिखर गाठले आणि बारामती तालुक्यातील वाघळवाडी परिसरासाठी अभिमानाची सुवर्णकथा घडली.
या यशामागे पिढ्यानपिढ्यांची घामाने भिजलेली कहाणी आहे. अठरा विश्व, बारा महिने मातीशी आणि दगडाशी दोन हात करत उभा राहिलेला हा संघर्ष आज फळाला आला आहे.
काजल आणि पायल या भगिनींनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर केवळ स्वतःचे नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न साकार केले आहे. वयाच्या अवघ्या वीसाव्या वर्षी पायल अनिता संजय शिंदे आणि एकोणीसाव्या वर्षी काजल अनिता संजय शिंदे यांनी मुंबई शहर पोलीस दलात पहिल्या प्रयत्नात निवड झाली आहे.
पायलने १२ वी आर्ट्समध्ये ७० टक्के गुण मिळवत पुढील शिक्षण सुरू ठेवले, तर काजलने १२ वी सायन्समध्ये ५९ टक्के गुण मिळवत शिक्षणाची वाटचाल कायम ठेवली. अभ्यास आणि पोलीस भरतीची तयारी यांचा समतोल साधत त्यांनी प्रत्येक दिवस संघर्षाचा पर्व केला. पहाटे पाच वाजता सुरू होणारा त्यांचा दिवस, घरातील टीव्ही बंद ठेवून केलेला अभ्यास, आणि वडिलांचे अभ्यासिकेत कधी जाणार असे विचारणारे शब्द हेच त्यांच्या यशाचे खरे आधारस्तंभ ठरले.
स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत त्यांनी दहावी-बारावी च्या तयारीसाठी पाऊल टाकले तिथेच अभ्यासाला धार दिली, तर या संस्थेचे गणेश सावंत यांचे मार्गदर्शन त्यांना पोलीस भरतीसाठी दिशा देणारे ठरले. मैदानी सरावासाठी अंकुश दोडमिसे यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या शरीरातच नव्हे, तर मनातही आत्मविश्वास रुजवून गेली.
घरची परिस्थिती साधी, पण स्वप्नं मात्र आभाळाएवढी! आयुष्यभर खोर-टिकाव घेऊन शेतात कष्ट करणाऱ्या वडिलांनी मुलींना शिक्षणाची ताकद दिली. तुम्हीच माझी बँक आहात, हे त्यांच्या वडिलांचे शब्द केवळ वाक्य नव्हते, तर विश्वासाचा अनमोल ठेवा होता. रस्त्याच्या कडेला लागलेल्या निवडीच्या बोर्डांकडे पाहत, एक दिवस इथे माझ्या मुलींचा फोटो लागेल, अशी स्वप्नं डोळ्यांत साठवणारे ते वडील आज अभिमानाने भारावून गेले आहेत.
सहा बहिणी आणि एक भाऊ असलेल्या या कुटुंबात शिक्षण घेणारी आणि शासकीय सेवेत जाणारी ही पहिलीच पिढी ठरली आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबाचा आनंद केवळ दुप्पट नाही, तर असंख्य पटींनी वाढला आहे.
काजल आणि पायल यांच्या यशाने संपूर्ण परिसरात प्रेरणेची नवी पहाट उगवली आहे. त्यांच्या या प्रवासाने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली.
जिद्द असेल, कष्टांची तयारी असेल आणि योग्य मार्गदर्शन मिळाले, तर कोणतेही स्वप्न दूर नसते! काजल आणि पायल यांनी पोलीस दलात जाण्याचे पाहिलेले स्वप्न त्यांनी घेतलेल्या मेहनतीने पूर्णत्वास गेले.
