सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अडीच तोळ्याचे गंठण हिसकावल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (ता.२७) पुन्हा एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी लांबवली.
भोर शहरातील भोरेश्वर मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावर सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. नीला जनार्धन मांडके (वय ८०, रा. गणेशपेठ, भोर) या पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाची सुमारे ४५ हजार रुपये किमतीची बकुळा माळ हिसकावून नेली.
त्यानंतर चोरट्यांनी इस्कॉन राजवाडा चौकाच्या दिशेने पळ काढला. या प्रकरणी नीला मांडके यांनी भोर पोलिसांत फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भोर पोलीस करीत आहेत.
दरम्यान, अवघ्या दोन महिन्यांत महिलांच्या दागिन्यांची चोरी होण्याची ही दुसरी घटना असल्याने भोर शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
