सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे
जावली तालुक्यातील आर्डे येथे शेतमजुरीच्या पैशांच्या वादातून एका व्यक्तीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आगतराव बाबुराव जाधव (वय ५७, रा. आर्डे, ता. जावली) यांचा मारहाणीत मृत्यू झाला असून या प्रकरणी आठ जणांविरोधात मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सविता आगतराव जाधव या अश्विनी दीपक जाधव व सुनिता विलास जाधव यांच्याकडे शेतमजुरीचे थकीत पैसे मागण्यासाठी गेल्या होत्या. या कारणावरून झालेल्या वादातून आरोपींनी संताप व्यक्त करत संगनमताने हल्ला केल्याचा आरोप आहे.
रोहिदास ज्ञानेश्वर जाधव, ऋतिक प्रकाश जाधव, अदिनाथ तुकाराम जाधव, अलंकार विलास जाधव, ओकार विलास जाधव आणि विलास शामराव जाधव (सर्व रा. आर्डे, ता. जावली, जि. सातारा) यांनी कुऱ्हाड व काठ्यांनी आगतराव जाधव यांच्यावर मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची फिर्याद सविता जाधव यांनी दिली आहे.
ही घटना दि. १९ रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता फिर्यादी यांच्या घरात घडली. मेढा पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत.
