सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथील कन्या तथा आष्टी (जि. बीड) येथील अॅड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालयाच्या हिंदी विभागातील प्राध्यापिका प्रा. शुभांगी मनोहर खुडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. “आत्मकथा लेखन की चुनौतियाँ और स्त्री प्रश्न (दलित स्त्री आत्मकथाकारों के विशेष संदर्भ में)” या विषयावरील त्यांच्या संशोधन प्रबंधास विद्यापीठाने मान्यता दिली.
विशेष म्हणजे, प्रा. शुभांगी खुडे यांचे पती तथा सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्राध्यापक प्रा. पोपट जाधव यांनाही मागील आठवड्यात हिंदी विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे.
एकाच आठवड्यात, एकाच विषयात आणि एकाच संशोधन केंद्रातून जाधव दाम्पत्याने डॉक्टरेट पदवी संपादन केल्याने सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या संशोधन कार्यासाठी प्रा. शुभांगी खुडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागातील डॉ. नितीन गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोरनाना हंबर्डे, प्राचार्य डॉ. सोपान निंबोरे, सचिव अतुलशेठ मेहेर, सहकारी प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
