सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
धाराशिव : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेच्या निकालात उमरगा तालुक्यातील गायत्री पाटील हिने शंभर टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यभरातून १७९ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले असून त्यामध्ये गायत्रीचा समावेश झाल्याने उमरगा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
गायत्रीने डॉ. के. डी. इंग्लिश स्कूलमधून शिक्षण घेतले. मुख्य विषयांमध्ये तिने ५०० पैकी ४९२ गुण मिळवले, तर संगीत विषयातील अतिरिक्त ८ गुणांची भर पडल्याने तिची एकूण टक्केवारी १०० झाली. तिच्या या यशामुळे कुटुंबीयांसह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अभ्यासासोबतच संगीताची आवड जपत गायत्रीने नियमितता, शिस्त आणि कठोर मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले. “सुरुवातीपासूनच चांगले गुण मिळवण्याचे ध्येय होते. रोज सकाळी लवकर उठून अभ्यास केला. आता डॉक्टर होऊन आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे,” अशी भावना गायत्रीने व्यक्त केली.
सध्या गायत्री NEET परीक्षेची तयारी करत असून भविष्यात डॉक्टर बनण्याचे तिचे ध्येय आहे. तिच्या या यशाबद्दल शिक्षक, नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
