Baramati Breaking l बारामती तालुक्यात खळबळ..! जोगवडीत जमीन वाटपाच्या वादातून तरुणाचा खून : तिघांविरोधात गुन्हा दाखल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम ——
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील जोगवडी येथे जमीन वाटपाच्या जुन्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात वडील, सावत्र आई आणि सावत्र भावाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जीवन संपत पोमण (वय ३२, व्यवसाय डेअरी व्यवसाय, रा. बो-हाळेवाडी पिंपळे, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही घटना उघडकीस आली.
दि. ८ मे २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास जोगवडी, ता. बारामती येथे घराशेजारी असलेल्या बाथरूमसमोरील जागेत सुरज संजय गुळुमकर यांचा मृतदेह आढळून आला. सुरज गुळुमकर यांचा अज्ञात हत्याराने डोक्यात वार करून खून करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, सुरज गुळुमकर यांचे वडील संजय धोंडीबा गुळुमकर, सावत्र आई माया संजय गुळुमकर आणि सावत्र भाऊ अथर्व संजय गुळुमकर यांनी संगनमताने घरातील पूर्वी झालेला वाद आणि जमीन वाटपाच्या कारणावरून हा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील हे करत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी भेट देऊन पाहणी केली.
To Top