सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील मार्गासनी येथील रोहन राहुल रणखांबे या विद्यार्थ्याने अपंगत्वावर मात करून दहावीच्या परीक्षेत 65.40 टक्के गुण मिळवले आहेत. त्यांचा या यशाबद्दल तालुक्यात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रोहन राहुल रणखांबे हा मार्गासनी गावात राहत असून जन्मताच त्याला कानाने ऐकू येत नसून तोंडाने बोलता देखील येत नाही. तरीदेखील त्याने सुरुवाती पासून शिक्षण घेण्याची जिद्द सोडली नाही.
सुरवातीला कॉकलिया फॉर एअर अँड स्पीच या संस्थेचे डॉ.अविनाश वाचासुंदर यांचा मोलाचा वाटा आहे.त्यांनी रोहन वर खूप परश्रम घेतले होते त्यानंतर मूकबधिर विद्यालय भोर येथे नववी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर येथील शिक्षणाची आवड असल्याने त्याने शिक्षण घेण्याचा हट्ट धरला. वडील राहुल रणखांबे हे पुण्यात मार्केट यार्ड मध्ये मजूर म्हणून काम करीत आहेत. मुलाच्या इच्छेसाठी त्यांनी रोहन ला वेल्हे येथील तोरणा विद्यालय येथे 10 वी मध्ये प्रवेश घेतला. येथील शिक्षकांनी त्याला शिकविण्यासाठी मेहनत घेतली. सगळ्या वर्गात एकच अपंग मुलगा असल्याने शिकवताना अडचणी येत होत्या. परंतु त्याची शिकण्याची जिद्द पाहून शिक्षक देखील त्याला शिकवू लागले. प्राचार्य संतोष चव्हाण, शिक्षिका कोमल भाबळे, तानाजी सागळे वर्गशिक्षक पी .जी.नाईकवले यांनी अथक परिश्रम घेतले.त्याचे वडील आटवड्यातून एकदा घरी येत. आल्यावर त्याचा अभ्यास करून घेत. आईदेखील त्याला शिकविण्यासाठी मेहनत घेत होती. मार्गासनी ते वेल्हे प्रवास बस ने आपली बहीण साक्षी सोबत करीत होता. अभ्यास करून त्याने दहावीच्या परीक्षेत 65.40 टक्के गुण मिळवले.
त्याच्या या यशाबद्दल आमदार शंकर मांडेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रविण शिंदे, सभापती सुवर्णा राऊत, उपसभापती संदीप खुटवड, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, तानाजी मांगडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष किरण राऊत, पंचायत समिती सदस्य गणेश जागडे, माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर, सुनील जागडे शिवराज शेंडकर, माजी सरपंच विशाल वालगुडे, शिवाजी चोरघे गणेश उफाळे,यांनी त्यांचे अभिनंदन केले.
