Sugar Factory News l एफआरपी वाढली..! पण एमएसपी स्थिरच : सहकारी साखर उद्योगातून चिंता व्यक्त

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
केंद्र शासनाने २०२६-२७ गळीत हंगामासाठी १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी प्रतिटन ३६५० रुपये आणि पुढील प्रत्येक टक्यासाठी ३६५ रुपये इतकी रास्त आणि किफायतशीर दर (FRP) जाहीर केली आहे. मात्र, साखरेच्या किमान विक्री किमतीत (MSP) भरीव वाढ करण्यात आलेली नसल्याने सहकारी साखर उद्योगातून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
सध्या साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये प्रति क्विंटल इतकाच कायम असून, केंद्र शासनाने २०१९ मध्ये MSP मध्ये शेवटची वाढ केली होती. त्यावेळी साखरेचा दर २९०० रुपयांवरून ३१०० रुपये प्रति क्विंटल करण्यात आला होता. त्यानंतर आजतागायत MSP मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. दरम्यान, FRP मध्ये सातत्याने वाढ होत असल्याने साखर कारखान्यांचे अर्थकारण विस्कळीत होत असल्याची भावना उद्योगातून व्यक्त केली जात आहे. साखर उद्योगाच्या मते, कारखान्यांचे आर्थिक संतुलन राखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अधिकचा दर देण्यासाठी MSP मध्ये भरीव वाढ होणे अत्यावश्यक आहे. मागील १७ वर्षांचा विचार केला असता FRP मध्ये मोठी वाढ झालेली दिसते. २००९-१० साली ९.५ टक्के साखर उताऱ्यासाठी प्रतिटन १२९८ रुपये आणि पुढील प्रत्येक टक्यासाठी १३७ रुपये FRP निश्चित करण्यात आली होती. त्याच तुलनेत २०२६-२७ मध्ये हीच FRP प्रतिटन ३६५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच गेल्या १७ वर्षांत FRP मध्ये तब्बल २३५२ रुपयांची वाढ झाली आहे.

याउलट, २००९-१० साली साखरेचा MSP २५९६ रुपये प्रति क्विंटल होता, तर २०२६-२७ मध्ये तो फक्त ३१०० रुपये इतकाच आहे. म्हणजे MSP मध्ये केवळ ५०४ रुपयांची वाढ झाली असून, FRP च्या तुलनेत MSP वाढ अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. FRP आणि MSP मधील वाढीतील फरक तब्बल ५५० रुपयांपर्यंत पोहोचल्याचेही निदर्शनास येत आहे.

केंद्र शासनाने यंदा उसाचा प्रतिटन उत्पादन खर्च १८२० रुपये गृहित धरून FRP जाहीर केल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, गेल्या १७ वर्षांत ऊस उत्पादन खर्चात मोठी वाढ झालेली असताना त्यानुसार साखरेच्या MSP मध्ये वाढ झालेली दिसत नसल्याची खंत उद्योगातून व्यक्त होत आहे.
साखरेचे बाजारभाव हंगामाच्या सुरुवातीपासून वर्षभर स्थिर राहत नाहीत. मागील दोन-तीन वर्षांत साखरेचे दर MSP च्या आसपासच राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची FRP देताना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड यांनी सांगितले की, “साखर कारखान्यांचे अर्थकारण सक्षम ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी केंद्र शासनाने MSP मध्ये भरीव वाढ करणे काळाची गरज आहे.
To Top