सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी, मुरूम, वाघळवाडीसह तालुक्यातील काही गावांमधून गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रोज सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत वीज गायब होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महावितरण मंडळाकडून सुरू असलेल्या गावठाण फिडरच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कॉन्ट्रॅक्टरने काम अर्धवट अवस्थेत सोडून दिल्याची चर्चा परिसरात असून, त्यामुळे संपूर्ण यंत्रणेवर ताण येत असल्याचे सांगितले जात आहे. याचा फटका वाणेवाडी, मुरूम, वाघळवाडीसह अनेक गावांतील नागरिकांना बसत आहे. सायंकाळच्या वेळेत वीज खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच घरगुती कामे, शेतीपंप, दुग्ध व्यवसाय, लघुउद्योग व व्यापारी व्यवहारांवरही परिणाम होत आहे. उकाड्याच्या वातावरणात नागरिकांना चार-चार तास अंधारात बसण्याची वेळ येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी अनेकदा महावितरण अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप केला आहे. गावठाण फिडरचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करून सुरळीत वीज पुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
