सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील एका तरुणाचे अपहरण करून सासवडच्या दिशेने गेल्याची माहिती मिळताच सुपे पोलिसांकडून फिल्मी स्टाईलने तीन तास त्या वाहनाचा पाठलाग करून दिवेघाट झेंडेवाडी ( ता. पुरंदर ) दरम्यान स्विफ्ट गाडीतील दोघांना ताब्यात घेऊन अपहरण तरुणाची सुटका करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री आकराच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी अपहरण कर्ता ऋषिकेश विजय चांदगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपे पोलीसांनी ओंकार प्रकाश भोसले ( वय २७ वर्ष), तन्मय सुधीर साळुंखे (वय २० वर्ष रा. सातव चौक, बारामती ) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेशचे अपहरण करून लाल रंगाच्या स्विफ्ट कार ( क्र. एम एच ४२ बी जे ४४४५ ) मधून ओंकार प्रकाश भोसले व तन्मय सुधीर साळुंखे यांनी जबरदस्तीने सासवडच्या दिशेने घेवुन नेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सुपे पोलिसांनी जेजुरी, सासवड, उरुळीकांचन व यवत पोलीस स्टेशन यांना नाकाबंदीबाबत सूचना देत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तसेच कुलदीप चांदगुडे यांना प्राप्त झालेल्या मोबाईल कॉलची माहिती मिळाल्यानंतर संबंधित मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण पोलिसांनी केले.
त्यानुसार दिवेघाट परिसरातील लोकेशन असल्याचे निष्पन्न झाल्याने सुपे पोलिस पथकाने तात्काळ दिवेघाट परिसरात जाऊन संशयित वाहनाचा पाठलाग सुरू केला. यादरम्यान सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कदम यांच्याशी संपर्क साधून मदत मागविण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जाधव व त्यांचे पथक मदतीस दाखल झाले. संयुक्त कारवाई दरम्यान झेंडेवाडी ( ता. पुरंदर ) येथे संशयित स्विफ्ट वाहन अडविण्यात आले. यावेळी त्यात असलेले ओंकार प्रकाश भोसले व तन्मय सुधीर साळुंखे आणि दिव्या ओंकार भोसले (वय २२ वर्ष रा. सातव चौक, बारामती ) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे अपहरण झालेला ऋषिकेश चांदगुडे यास सुरक्षितरित्या शोधून काढण्यात आले. यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांवर यापुर्वीचे जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल असुन आत्ताही त्याच कलमाखाली अटक करण्यात आल्याची माहिती सपोनि मनोजकुमार नवसरे यांनी दिली.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली तर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलीस हवालदार विशाल गजरे, पोलीस हवालदार रुपेश साळुंखे, पोलीस हवालदार संदीप लोंढे, चालक पोलीस शिपाई सोमनाथ होले, पोलीस शिपाई सागर वाघमोडे, पोलीस शिपाई संतोष जावीर, पोलीस शिपाई भाऊसाहेब चौधरी, महिला पोलीस हवालदार दिपाली मोहिते, पोलीस शिपाई सचिन दरेकर व पोलीस शिपाई विलास वाघमारे आदींच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
.....................
