Baramati News l उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बस सेवेचे लोकार्पण

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बारामती : प्रतिनिधी
बारामती आगारात नव्याने दाखल झालेल्या १० अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बस सेवेचे लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या समस्या सोडविणे, बसमधील स्वच्छता राखणे, बसेस वेळेवर सोडणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यावर भर द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
बारामती बसस्थानक येथे आयोजित ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान २०२५’ मध्ये राज्यात अव्वल क्रमांक पटकावल्याबद्दल एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, एसटी महामंडळाचे पुणे विभाग नियंत्रक अरुण सिया, गटविकास अधिकारी किशोर माने, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, विभागीय कामगार अधिकारी सचिन भुजबळ, आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे, माजी सहाय्यक वाहतूक अधीक्षक घनश्याम सदाशिव शिंदे यांच्यासह महामंडळाचे कर्मचारी, संघटनांचे पदाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान २०२५’ अंतर्गत बारामती बसस्थानकाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत एक कोटी रुपयांचे बक्षीस आणि स्मृतिचिन्ह मिळविले आहे. बारामती तालुक्यातील विकासकामांना स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या दूरदृष्टीतून उभारण्यात आलेले बारामती बसस्थानक आज राज्यासाठी आदर्श ठरले असून या यशामुळे बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्या पुढे म्हणाल्या की, या पुरस्कारामुळे बारामतीकरांची जबाबदारी अधिक वाढली असून बसस्थानक परिसराची स्वच्छता, सुविधा आणि व्यवस्थापन कायम राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांनी बारामतीकरांसह एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमात नव्याने दाखल झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच बारामती बसस्थानकाच्या यशस्वी कामगिरीचा गौरव करत विकासकामांची ही परंपरा पुढेही कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
To Top