Satara Accident News | डिस्कळ येथील भीषण अपघातानंतर पोलिसांची कारवाई; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
खटाव, प्रतिनिधी 
पुसेगाव-फलटण राज्य मार्गावरील डिस्कळ (ता. खटाव) गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. महेंद्र जालींदर माने (वय ४०, रा. डिस्कळ, ता. खटाव, जि. सातारा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पुसेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ जून रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास महेंद्र माने हे त्यांच्या मोटरसायकलवरून (एमएच ११ बीएम ६४७६) पुसेगाव-फलटण राज्य मार्गाने डिस्कळच्या दिशेने जात होते. डिस्कळ गावच्या हद्दीतील गाव ओढ्याजवळ मागून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की महेंद्र माने यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच त्यांच्या मोटरसायकलीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर संबंधित वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी मृत महेंद्र माने यांचे चुलते अविनाश सिताराम माने यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे
To Top