Baramati News l बारामतीत वादळी पावसाचा फटका; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची नुकसानग्रस्त केळी पिकांची पाहणी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बारामती, प्रतिनिधी 
बारामती, दि. ६ : बारामती तालुक्यात शुक्रवारी (५ जून) झालेल्या वादळी पावसामुळे काऱ्हाटी परिसरातील केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शनिवारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार स्वप्नील रावडे, तालुका कृषी अधिकारी सचिन हाके, स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.
सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम लवकर मिळावी यासाठी तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. राज्य शासन संकटाच्या काळात नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
मौजे माळवाडी (लोणी) येथे २ जून रोजी झालेल्या वादळात पत्र्याच्या शेडखाली दबून मृत्यू झालेल्या नंदाबाई जनार्धन लडकत यांच्या कुटुंबीयांची सुनेत्रा अजित पवार यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्या हस्ते कुटुंबीयांना ४ लाख रुपयांचा मदतनिधी तसेच दोन शेळ्यांच्या नुकसानीपोटी ८ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच प्रल्हाद पांडुरंग लडकत यांना १६ हजार रुपये, बाळासाहेब अमृता लडकत यांना ८ हजार रुपये आणि नंदा प्रताप फरांदे यांना १२ हजार रुपयांचे नुकसानभरपाईचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.

      वादळी पावसामुळे गुणवडी येथील राधा रवीन आगवणे यांच्या घरावरील पत्रे उडून गेली आहेत. काऱ्हाटी येथील नारायण लोणकर यांच्या शेतातील सुमारे २५० ते ३०० केळीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. तर मोडवे येथील गुलाब मोटे यांच्या १० शेळ्या, ३ मेंढ्या आणि १ कुत्र्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तालुक्यातील चार गावांमधील १६९ शेतकऱ्यांच्या सुमारे ९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काटेवाडी परिसरातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा आढावा घेत तातडीने मदत प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना दिल्या.
To Top