सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील वारवंड (ता. भोर) येथे कॅरी टेम्पो आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी घडलेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून कारमधील एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोर-महाड मार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू असून काही भागात रस्ता सुस्थितीत असल्याने वाहने वेगाने धावत आहेत. तसेच रायगड येथे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जाणाऱ्या वाहनांचीही या मार्गावर मोठी वर्दळ होती.
याचदरम्यान पंढरपूरहून रायगडकडे जाणारा कॅरी टेम्पो (एमएच ४५ एएक्स २४९१) आणि महाडहून पुण्याकडे येणारी स्विफ्ट डिझायर (एमएच १२ पीझेड ७६४७) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारमधील एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारांसाठी पुण्यात हलविण्यात आले आहे. तसेच काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच भोर पोलिस ठाण्याचे हिर्डोशी बीट अंमलदार अजय साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना उपचारासाठी रवाना करत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले.
अपघाताचे नेमके कारण समोर आले नसले तरी वाहनांचा वेग आणि वाढलेली वाहतूक यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
