सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निरा–मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे शनिवारी (दि. ६) सायंकाळी साडेचारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला लहान भाऊ गंभीर जखमी झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे सोमेश्वरनगर व मुरूम परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौधरवाडी फाट्याजवळ इलेक्ट्रिक स्कुटी आणि आयशर टेम्पो (क्र. DD-01-G-9343) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की स्कुटीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर टेम्पोने स्कुटीला काही अंतर फरपटत नेल्याने दुर्घटनेची तीव्रता अधिक वाढली.
या अपघातात अक्षदा ज्ञानेश्वर बोडरे (वय १७) व सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय १५), रा. मुरूम, ता. फलटण, जि. सातारा या दोन्ही बहिणींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचा भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे (वय ९) गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघाताचे भीषण स्वरूप पाहून उपस्थित नागरिकही हादरून गेले. या घटनेमुळे काही काळ निरा–मोरगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संबंधित टेम्पो चालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत.
या दुर्दैवी अपघातामुळे बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सोमेश्वर व मुरूम परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
